मुंबई/उदय दणदणे: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात गेली ६५ वर्षे अविरत कार्यरत असणाऱ्या कलगी तुरा समाज उन्नती मंडळ-मुंबई यांनी आयोजित केलेल्या ‘गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा-२०२५’ मध्ये गुहागर तालुक्यातील धाकुनाथ नृत्य कलापथक यांनी प्रथम क्रमांक पटकावून कोकणी कलेचा मान उंचावला आहे. सुशांत गणेश जाबरे – संस्थापक (विभग फाउंडेशन) यांच्या विशेष सहकार्याने हा भव्य त्रिवेणी सोहळा रविवार, ०७ डिसेंबर २०२५ रोजी भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह, दहिसर चेक नाका, मीरारोड (पूर्व) मुंबई उपनगर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या समारंभास सुरेश ऐणारकर यांचे अध्यक्षस्थान लाभले, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या त्रिवेणी सोहळ्यामध्ये गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा, कलगी तुरा दिनदर्शिका-२०२६ प्रकाशन आणि शाहीर गुणगौरव व समाजसेवकांचा पुरस्कार वितरण सोहळा यांचा समावेश होता. यातील जाखडी नृत्य स्पर्धेला अवघ्या कोकण कलाविश्वातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि संस्थेच्या नियमावलीनुसार एकूण ८ संच अंतिम करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या या संचांनी दिवसभर चाललेल्या स्पर्धेत पारंपरिकता जपत अत्यंत नेत्रदीपक जाखडी नृत्ये सादर करून कलाप्रेमी रसिकांची मने जिंकली. स्पर्धेत प्रकाश मित्र मंडळ (कळझोडी), धाकुनाथ नृत्य कलापथक (भातगाव, तिसंग), शिवशक्ती नाच मंडळ (पूर्व तांबेवाडी), श्री जुगाई देवी नृत्य कला पथक (काजुर्ली), शिवशक्ती नाच मंडळ (मांडवकर वाडी), श्री जांग्लेश्वर नृत्य कला पथक (आगरनरळ), श्री कालकाई देवी कलामंच (कोळबांद्रे) आणि श्री विठ्ठल रखुमाई नाच मंडळ (गवाणे) या ८ कलापथकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे निकाल जाहीर करताना परीक्षकांनी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम ठेवली होती. परीक्षकांच्या अचूक परीक्षणातून गुहागर येथील धाकुनाथ नृत्य कलापथक यांनी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरत ११,००० रुपये रोख आणि आकर्षक स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र पटकावले, तसेच ढोलकी देऊन त्यांना गौरविण्यात आले. शिवशक्ती नाच मंडळ (मांडवकरवाडी, कोतवली) यांनी द्वितीय क्रमांक पटकावत ७,००० रुपये रोख पारितोषिक मिळवले, तर तृतीय क्रमांक श्री जुगाई देवी नृत्य कलापथक (काजूर्ली, गुहागर) यांना मिळाला, त्यांना ५,००० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. यासोबतच वैयक्तिक गटात उत्कृष्ट गायक म्हणून सुभाष बावदाने यांना कराओके माईक आणि उत्कृष्ट वादक म्हणून नितेश वसंत लोखंडे यांना ढोलकी देऊन आकर्षक स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व संचांना ढोलकी, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी सुरेश ऐनारकर (स्पर्धा सरपंच), संतोष गोविंद धारशे, डॉ. सूर्यकांत दत्ताराम चव्हाण, अनंत तांबे, सुरेश कदम, चंद्रकांत गोताड, झराजी वीर, चंद्रकांत धोपट, सुरेश चिबडे, अशोक पाटील, सुरेश गंगाराम वीर, दिलीप शंकर नामे, प्रकाश पाजणे आणि तुषार पंदेरे यांसारखी नामवंत मंडळी परीक्षक म्हणून लाभली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद गांधी (उद्योजक/गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष-मनसे), राहुल शिंदे (विभग फाउंडेशन), कैलास धाडवे (समाज सेवक), ॲड दिपांजली कैलास धाडवे, प्रमिल पत्याने (उद्योजक), दिनेश कुरतडकर (समाज सेवक), रवींद्र मटकर (अध्यक्ष न.लो.संस्था), ॲड राकेश रविंद्र साळुंखे (अध्यक्ष राष्ट्रवादी रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेल), माधव कांबळे (सहसेक्रेटरी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई) आणि विभग फाउंडेशन टीम अशी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे निवेदन संस्थेचे सरचिटणीस संतोष धारशे आणि सहसचिव सुधाकर मास्कर यांनी केले.





