चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पेढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. उपसरपंचपदासाठी तुषार गमरे यांचा एकमेव उदेवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच आरूषी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.
पेढे ग्रामपंचायतीची निवडणूक २०२२ मध्ये झाली होती. यापूर्वी गेली अनेक वर्षे पेढे ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचे एकहाती वर्चस्व राहिले होते. मात्र तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार शेखर निकम यांच्या समर्थकांनी ग्रामपंचायतीत ७ जागा जिंकून सत्ता मिळवली होती. तर विरोधी ठाकरे सेनेच्या गटाला ४ जागा मिळाल्या होत्या. थेट सरपंचपदी सौ. आरूषी शिंदे विजयी झाल्या होत्या. पहिल्या टप्प्यात उपसरपंचपदासाठी अष्टविनायक टेरवकर व निशिकांत माळी यांना गेल्या तीन वर्षात उपसरपंचपदाची संधी मिळाली. माळी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी दि. १३ रोजी उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी ठाकरे सेनेच्या चारही सदस्यांनी तुषार गमरे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे गमरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
उपसरपंच गमरे हे आमदार शेखर निकम यांचे खंदे समर्थक असून सामाजिक क्षेत्रातही ते सक्रीय राहिले आहेत. त्यांच्या निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे, सरपंच सौ. आरुषी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजु जाधव, सुनिल गमरे, शिंदे गुरूजी, दिवाकर जाधव, विद्याधर गमरे, माधवराव गमरे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो फाईल- सीपीएन१४-१२







