GRAMIN SEARCH BANNER

नाणीज येथे इको गाडीची बोलेरो पिकअपला समोरासमोर धडक; पुण्यातील चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नाणीज जुनामठ येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एका इको गाडीने समोरून जाणाऱ्या बोलेरो पिकअपला जोरदार धडक देऊन भीषण अपघात घडवला. या अपघातात प्रवासी जखमी झाले असून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. १० एप्रिल रोजी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात इको चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील हवेली तालुक्यातील रहिवासी असलेला आरोपी चालक गौरव प्रताप हारगुडे हा आपल्या ताब्यातील इको गाडी (क्र. MH 12 XT 5441) मधून कोल्हापूर ते रत्नागिरी असा प्रवास करत होता. गाडीमध्ये प्रवासी साक्षीदार असतानाही, नाणीज जुनामठ येथे महामार्गावरील वाहतूक ही एका बाजूने सुरू आहे हे माहिती असूनही चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. आपली गाडी अतिवेगात आणि हयगयीने चालवून समोरून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला (क्र. MH 08 AP 8488) बोनेट आणि बंपरच्या मधोमध जोराची धडक दिली. या धडकेमुळे बोलेरो पिकअपमधील सचिन गोकळ पारकर हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची फिर्याद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार तृप्ती रविकांत सावंतदेसाई यांनी दिली असून पोलिसांनी १६ एप्रिल रोजी दुपारी या प्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवला आहे. आरोपी चालकावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार कारवाई करण्यात आली आहे. महामार्गावर होत असलेल्या या सातत्याच्या अपघातांमुळे आणि बेशिस्त ड्रायव्हिंगमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

Total Visitor Counter

3486471
Share This Article