चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार शेखर निकम चषक राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीतील संघांनी वर्चस्व गाजवले. इलेव्हन फायटर एडी, रत्नागिरी संघाने विजेतेपद पटकावले, तर आरडीसीए संघ उपविजेता ठरला. साहिल मतदार याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानावर सलग सहा दिवस ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेचे उद्घाटन रणजीपटू सुनील मोरे यांच्या हस्ते आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झाले होते. एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
अंतिम सामन्यात इलेव्हन फायटर एडी संघाने आरडीसीए संघासमोर 189 धावांचे आव्हान ठेवले. मात्र, हे आव्हान पेलण्यात अपयशी ठरत आरडीसीए संघ सर्वबाद झाला आणि एडी संघाने विजेतेपद मिळवले. एडी संघाचा विश्वास कुंभार याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तर चिपळूण स्टार क्लबच्या विराज कोलते याला उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार मिळाला. कोलतेने चार डावांत 53.25 च्या सरासरीने 213 धावा केल्या. आरडीसीए संघाचा पार्थ गांधी पाच डावांत 12 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाज ठरला.
विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांना क्रिकेट विश्वातील नामवंत फिरकीपटू राजेश पवार, आमदार शेखर निकम आणि असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाला चिपळूण नगर परिषदेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक विकी नरळकर, माजी नगरसेविका अदिती देशपांडे, दिशा दाभोळकर, राणी महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंच गोट्या भोसले, रवींद्र कनगुटकर, समालोचक बाबल्या जाधव, इब्राहिम सरगुरोह, प्रशिक्षक उदय काणेकर, तसेच स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेणारे भाऊ देवरुखकर आणि गुणलेखक यांचा सन्मान करण्यात आला. चिपळूणमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण’चे अध्यक्ष सुनील साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे सचिव राजेश सुतार, दादा लकडे, सुयोग चव्हाण, योगेश बांडागळे, सचिन कुलकर्णी, सुनील रेडीज, साहिल कदम, विनीत देवधर, संदेश गोरीवले आदींनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, बक्षीस वितरणावेळी बोलताना क्रिकेटपटू राजेश पवार यांनी चिपळूणमध्ये मुंबई-पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार स्पर्धा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उत्तम सुविधा उपलब्ध होत असून भविष्यात येथील खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम चषक स्पर्धेत रत्नागिरीच्या संघांचे वर्चस्व; इलेव्हन फायटर एडी विजेता





