GRAMIN SEARCH BANNER

‘१९६२ कॉल सेंटर’ व मोबाईल वेटरनरी क्लिनीकचा प्रभाव; पशुपालकांना दारातच उपचार

Gramin Varta
26 Views

मुंबई: राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या ‘१९६२ कॉल सेंटर’ आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीकच्या प्रभावी समन्वयामुळे पशुपालकांना तातडीच्या व दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध होत आहेत.

या उपक्रमामुळे विशेषतः दुर्गम व डोंगराळ भागातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला असून, हजारो पशुधनाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

गेल्या वर्षभरात ‘१९६२’ हेल्पलाईनवर एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले असून त्यापैकी ३,७८,०३५ प्रकरणांचे यशस्वी निराकरण करण्यात आले आहे. तब्बल ३४,९७९ पशुपालकांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. अपघात, विषबाधा, कठीण प्रसूती यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यामुळे ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. यात २९,१३० मोठे व ३५,५६९ लहान पशुधनाचा समावेश आहे.

या सेवेमुळे पशुपालकांना जनावरे दवाखान्यात नेण्याची गरज कमी झाली असून, तज्ज्ञ पशुवैद्यकीय पथक अवघ्या दीड तासात घटनास्थळी पोहोचते. औषधोपचार, शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतन, लसीकरण, जंतनाशन, वंध्यत्व तपासणी अशा विविध सेवा या माध्यमातून पुरवल्या जात आहेत. तसेच पशुआरोग्य व आहार व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनही दिले जाते.

दरम्यान, या सेवेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर, कॉल ट्रॅकिंग व फीडबॅक प्रणालीचा वापर केला जात आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या सहाय्याने प्राथमिक सल्ला देण्याची सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे.

या उपक्रमामुळे पशुधनाचे नुकसान कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असून, पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

3314508
Share This Article