चिपळुणात जमिनीच्या वादातून रिक्षा चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

चिपळूण (प्रतिनिधी): शहरातील यशोधन नगर परिसरातील हॉटेल काशिराम रेस्ट हाऊस शेजारी जमिनीच्या जुन्या वादातून एका ६७ वर्षीय ज्येष्ठ रिक्षा चालकाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात किसन काशिराम भुवड, संजय उर्फ बंड्या किसन भुवड, वैभव किसन भुवड आणि विश्वास भुवड (सर्व राहणार पागनाका, गोपाळकृष्णवाडी) या चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन विठोबा किंजळकर आणि आरोपी भुवड यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमीन जुमल्यावरून वाद सुरू आहेत. मंगळवारी, २१ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास वादाच्या जागेत आरोपी कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता मोजणी करत होते. याबाबत गजानन किंजळकर यांनी किसन भुवड यांना विचारणा केली असता, याचा राग मनात धरून किसन भुवड यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले आणि किसन भुवड यांनी किंजळकर यांना हाताच्या ठोशाने व दगडाने डाव्या डोळ्याजवळ मारून गंभीर दुखापत केली.

मारहाण सुरू असतानाच त्या ठिकाणी संजय उर्फ बंड्या भुवड, वैभव भुवड आणि विश्वास भुवड हे देखील आले. या सर्वांनी संगनमत करून “हा एकटाच भेटला आहे, याला तुडवा, सोडू नका, ठार मारा” अशा धमक्या देत किंजळकर यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी पोटावर, पाठीवर आणि पायावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक असलेले किंजळकर जखमी झाले असून, त्यांनी बुधवारी दुपारी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *