GRAMIN SEARCH BANNER

महाड-मंडणगड मार्गावर अवकाळी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य; अर्धवट पुलाच्या कामाचा प्रवाशांना फटका

Gramin Varta
4 Views

मंडणगड (प्रतिनिधी): महाड-मंडणगड खाडीपट्टा मार्गावरील चोचिंदे, वणी-कोंड दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या अर्धवट कामामुळे आणि झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मागील चार वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आधीच नागरिक त्रस्त असताना, आता पावसामुळे तयार झालेल्या चिखलातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सायंकाळच्या सुमारास या मार्गावर वाहने घसरून अपघाताची भीती निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महाड ते मंडणगड मार्गाचे चौपदरीकरण अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत केले जात आहे. चोचिंदे परिसरात एका छोट्या पुलाचे बांधकाम सध्या सुरू असून, वाहतुकीसाठी या ठिकाणी पर्यायी बाह्यवळण (बायपास) रस्ता तयार करण्यात आला आहे. या बाह्यवळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात आली होती, मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या मातीचे चिखलात रूपांतर झाले. या चिखलातून दुचाकी आणि चारचाकी वाहने काढताना चालकांचा ताबा सुटत असून, अनेकांना आपली वाहने ढकलत नेण्याची वेळ आली आहे. धुळीच्या त्रासानंतर आता चिखलाच्या संकटामुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

पावसाळा सुरू होण्यास आता अवघ्या दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. अवकाळी पावसाच्या एका सरीने जर ही अवस्था होत असेल, तर प्रत्यक्ष पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही, तर खाडीपट्ट्यातील प्रवाशांचे हाल अधिक वाढणार आहेत. संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

Total Visitor Counter

3316478
Share This Article