आंबा घाटात भीषण अपघात : साखरेचा ट्रक दरीत कोसळला, चालकाचा मृत्यू

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रमेश शिंदे / भडकंबा : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात साखरेने भरलेला ट्रक थेट दरीत कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महंमद रामशेर ताहीर हुसेन अन्सारी (वय ३६, रा. भोटारावा, पोस्ट कर्मा, ता. कोंडरमा, राज्य झारखंड) हे आपल्या ताब्यातील एमएच १० डीटी ४४०९ क्रमांकाचा ट्रक घेऊन फलटण येथून साखरेची पोती भरून जयगडच्या दिशेने निघाले होते. सकाळी सुमारे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहनाचा ताबा सुटल्याने ट्रक बंद रस्त्यालगतच्या दरीत कोसळला.

या भीषण अपघातात चालक अन्सारी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्यासह साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *