GRAMIN SEARCH BANNER

लांजा तालुक्यातील कुरंग येथे घराचे छप्पर काढून ४ लाखांचे नुकसान; एकावर गुन्हा दाखल

लांजा: तालुक्यातील कुरंग मधलीवाडी येथे मालकीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून घराचे छप्पर, कौले आणि लाकडी साहित्याची तोडफोड करत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आरोपी बाळकृष्ण रमेश पांचाळ (रा. झर्ये, ता. राजापूर) याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरंग मधलीवाडी येथील घर क्रमांक १३४(अ) (३)१, १३४(अ) (३)२ आणि १३४(अ) (३)३ हे फिर्यादी श्रीपाद महादेव कदम आणि त्यांच्या साक्षीदारांच्या सामूहिक मालकीचे आहे. या घराचे छप्पर एकच असून अंतर्गत भाग विभक्त आहेत. आरोपी बाळकृष्ण पांचाळ याने या घराच्या दुरुस्तीचे काम घेतल्याचे फिर्यादींना समजले होते. त्यावेळी फिर्यादींनी आरोपीला स्पष्ट बजावले होते की, त्यांच्या मालकीच्या घराचे काम न करता केवळ इतरांच्या भागाचे काम करावे. असे असतानाही, १५ एप्रिल ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादींच्या संमतीशिवाय घरामध्ये प्रवेश केला.

या दरम्यान आरोपीने घराच्या छपरावरील कौले, लाकडी रिपा आणि वासे काढून टाकले. त्यातील काही महत्त्वाचे साहित्य मोडून-तोडून टाकत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. इतकेच नव्हे तर घरांतर्गत असलेल्या सर्व सामानाचीही नासधूस करण्यात आली आहे. या सर्व प्रकारात फिर्यादींचे सुमारे ४ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड येथे राहणाऱ्या श्रीपाद कदम यांनी या प्रकरणी लांजा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३२९(४) आणि ३२४(५) नुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गावातील घराच्या वादातून झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरात चर्चा सुरू आहे.

Total Visitor Counter

3484983
Share This Article