GRAMIN SEARCH BANNER

गुहागरमध्ये पोस्टमनचा धक्कादायक प्रकार; दीड वर्षे टपाल घरातच ठेवले साठवून

गुहागर: गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे कर्तव्यात कमालीचा कसूर केल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आला असून, एका पोस्टमनने गेल्या दीड वर्षांपासून ग्रामस्थांची टपाले चक्क स्वतःच्या घरातच साठवून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड येथील करन थोरात नामक या पोस्टमनने शेकडो पत्रे, शासकीय कागदपत्रे आणि महत्त्वाची कार्डे वितरीतच न केल्याने लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाच्या या कारभारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वेळणेश्वर येथील ग्रामस्थांना आपल्या टपालाचे ट्रॅकिंग रिपोर्ट मोबाईलवर दिसत असूनही प्रत्यक्षात टपाल मिळत नसल्याने तक्रारी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर, नुकतेच रुजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन पोस्टमन करन थोरात याच्याकडे विचारणा केली, मात्र त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने संशय बळावला. अखेर पोस्टमास्तरांनी पोस्टमनच्या घरी जाऊन पाहणी केली असता, तिथे टपालाने भरलेली दोन मोठी पोतडी सापडली. यामध्ये बँकेच्या लिलाव नोटिसा, पासबुके, चेकबुके, बँकिंग कार्डे, एलआयसी सर्टिफिकेट्स, तलाठ्यांची पत्रे, मुंबई विद्यापीठाची कागदपत्रे आणि मोजणीच्या नोटिसा अशा महत्त्वाच्या कागदपत्रांचा ढीग आढळून आला.

या प्रकारामुळे अनेकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. जमिनीच्या मोजणीची नोटीस वेळेत न मिळाल्याने काहींना दोन ते तीन वेळा फी भरावी लागली, तर बँकेची लिलाव नोटीस न मिळाल्यामुळे काहींच्या दागिन्यांचा लिलाव झाल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली आहे. अनेकांची शासकीय कामे खोळंबली असून या सर्व नुकसानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघड होताच पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशू जोशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, जिल्हा कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी शनिवारी सकाळी वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात दाखल होऊन पुढील कार्यवाही करणार आहेत. आता या बेजबाबदार पोस्टमनवर काय कारवाई होते आणि ग्रामस्थांच्या नुकसानीची दखल घेतली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3485950
Share This Article