GRAMIN SEARCH BANNER

राज्यातील पारंपरिक उद्योगांसाठी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

पुणे : महाराष्ट्रात अनेक पारंपरिक उद्योगांचे जाळे आहे. या उद्योगांमध्ये प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) समावेश आहे. या पारंपरिक उद्योगांना बळ देण्याची आवश्यकता आहे.

कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून बँका हे काम करतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केली.

स्टेट बँकेच्या स्थानिक मुख्यालयाचे उद्घाटन सीतारान यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू आणि बँकेचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासलू शेट्टी उपस्थित होते. सीतारामन म्हणाल्या की, महाराष्ट्राची ओळख एमएसएमईसाठी आहे. राज्याच्या पूर्व आणि नैऋत्य भागात अनेक पारंपरिक उद्योग आहेत. हे पारंपरिक उद्योग प्रामुख्याने एमएसएमई क्षेत्रातील आहेत. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या उद्योगांना बळ द्यायला हवे. यासाठी बँकांनी राज्याच्या विविध भागात जाऊन या उद्योगांना बळ द्यावे. महाराष्ट्राच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान आहे. बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेले अनेक क्षेत्रे असून, त्यांना पुढे आणण्याची आवश्यकता आहे.

यावेळी बोलताना स्टेट बँकेचे अध्यक्ष शेट्टी म्हणाले की, पुणे हे औद्योगिक केंद्र असून, या ठिकाणी मुख्यालय सुरू करण्यात आले. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राचे बँकेचे कामकाज येथून चालेल. पुण्यातील आर्थिक परिसंस्था वेगाने विकसित होत आहे. या ठिकाणाहून राज्याच्या कानकोपऱ्यातील नागरिकांना बँकिंग सेवा दिल्या जातील.

मायथोसच्या आव्हानावर ‘एआय’नेच मात करू

अँथ्रोपिकच्या मायथोस या कृत्रिम प्रज्ञा (एआय) मॉडेलमुळे बँकिंग क्षेत्राच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, एआयमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. स्टेट बँकेचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासलू शेट्टी हेच इंडियन बँकिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व बँका यावर काम करीत आहेत. पुढील काही आठवड्यांत यावर सविस्तर चर्चा केली जाईल. या परिस्थितीत कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, यावरही विचार करण्यात येईल. यासाठी आणखी गुंतवणूकही करण्यात येईल.

महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या सुरू असलेले अनेक उद्योग आहेत. या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हे पारंपरिक उद्योगांचे जाळे महत्वाचे असून, ते राज्याचे ओळख आहे. त्यांच्यासाठी अर्थसंकल्पातही घोषणा करण्यात आली असून, बँकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचून मदत करावी. – निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

Total Visitor Counter

3485489
Share This Article