GRAMIN SEARCH BANNER

ग्रामविकासासाठी क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्रसाद देवस्थळी यांची ‘समर्थ रत्न’ पुरस्कारासाठी निवड

Gramin Varta
15 Views

संगमेश्वर : धामापूर तर्फे संगमेश्वर गावाचे रहिवासी व सुवर्णसूर्य फाऊंडेशनचे संचालक श्री प्रसाद देवस्थळी यांची ‘समर्थ रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सुवर्णसूर्य फाऊंडेशनच्या माध्यमातून जवळपास ३० ते ३५ गावांमध्ये क्रीडा पर्यटनाद्वारे संधी निर्माण केल्याबद्दल, तसेच मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉनसारख्या उपक्रमांतून कोकणात फिटनेसची चळवळ उभी केल्याबद्दल आणि स्थानिकांना कोकणात राहून आर्थिक उन्नतीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री देवस्थळी यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये १०,००० आणि पुणेरी पगडी असे आहे. मराठी कला विश्वातील ज्येष्ठ गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्री देवस्थळी यांच्यासोबत रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. अलिमिया परकार, पावस देवस्थानचे विश्वस्त श्री जयंतराव देसाई, गणपतीपुळे देवस्थानचे पंच डॉ. विवेक भिडे तसेच अवघ्या २१ महिन्यांच्या वयात १०० मीटर अंतर पार करून वर्ल्ड रेकॉर्ड करणारी कु. वेदा सरफरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

धामापूर तर्फे संगमेश्वरसारख्या छोट्या खेड्यातून सुरू झालेली ही चळवळ अख्ख्या कोकणात पोहोचत आहे, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. “आधी केले आणि मग सांगितले” या उक्तीप्रमाणे काम केले पाहिजे, अशी शिकवण धामापूर गावातील ग्रामस्थांकडून मला मिळत असते. त्यामुळे हा सन्मान माझ्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून धामापूर गावातील कष्टकरी ग्रामस्थांचा सन्मान आहे, असे श्री प्रसाद देवस्थळी यांनी नमूद केले.

हा कौतुक सोहळा दिनांक २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. यानंतर डॉ. सलील कुलकर्णी यांचे सुश्राव्य गायनही रसिकांना अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘समर्थ रत्न’ पुरस्काराचे आयोजक समर्थ इन्वेस्टमेंट्स यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3203534
Share This Article