रायपाटण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटणनजीक असलेल्या नडगिवे-बांबरवाडी एस.टी. बस स्थानकाजवळील धोकादायक वळणावर बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कलिंगडाने भरलेला पिकअप बोलोरो टेम्पो उलटल्याची घटना घडली.
चिपळूण येथील वाहन चालक ऋतुराज जयराम वेलोडे हा वैभववाडी येथून सुमारे अडीच टन कलिंगड घेऊन चिपळूण-सावर्डेच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. नडगिवे येथील अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला, ज्यामध्ये सुमारे १ लाख रुपयांच्या कलिंगड मालाचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण महामार्गावर कलिंगडांचा खच पडला होता. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, चालक ऋतुराज सोबत असलेले एकनाथ तांबे यांच्या हाताच्या कोपराला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल प्रशांत पाटील आणि शरद गुहाडे यांनी तातडीने धाव घेत पलटी झालेला टेम्पो बाजूला केला आणि सुमारे एक तास विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. विशेष म्हणजे नडगिवे येथील याच वळणावर गेल्या आठवडाभरातील हा तिसरा अपघात असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने या जीवघेण्या वळणांकडे दुर्लक्ष केल्यास अपघातांची मालिका सुरूच राहील, असा इशारा देत प्रशासनाने आमचा अंत न पाहता ही वळणे तातडीने काढावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







