रत्नागिरी: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये इतकी वाढली आहे की, ठिकठिकाणी चित्रपटगृहे हाऊसफुल्ल होत आहेत. मात्र, रत्नागिरीमध्ये एका चाहत्याने आपल्या लाडक्या राजाचा चित्रपट पाहण्यासाठी चक्क अख्खं थिएटर बुक केल्याची अनोखी घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील ऋषी भाग्या या रीलस्टारने आपल्या कुटुंबासह हा चित्रपट पाहण्यासाठी ही खास सोय केली होती. “आमच्या राजाचा सिनेमा बघायला पूर्ण हॉल बुक केलाय”, असे अभिमानास्पद कॅप्शन देत ऋषीने समाजमाध्यमांवर याबद्दलची माहिती आणि काही फोटो शेअर केले आहेत. या खास स्क्रीनिंगच्या वेळी संपूर्ण चित्रपटगृहामध्ये ऋषी, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी असे केवळ तिघेच जण उपस्थित होते. आपल्या आराध्य दैवताचा इतिहास शांततेत आणि कुटुंबासोबत अनुभवता यावा, या उद्देशाने या चाहत्याने उचललेले हे पाऊल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
एकीकडे हा चित्रपट चित्रपटगृहात गर्दीचे विक्रम मोडत असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या चाहत्यांमुळे या चित्रपटाची व्याप्ती आणि लोकांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रितेश देशमुख यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रेक्षकांकडून मिळणारा हा प्रतिसाद मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत सकारात्मक मानला जात असून, ऋषी भाग्या यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.





