GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत हळहळ; राजिवडा येथील १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
134 Views

रत्नागिरी: शहरालगतच्या राजिवडा परिसरात एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अर्चना दीपक बोंद्रे असे मृत मुलीचे नाव असून ती केवळ १६ वर्षांची होती. राजिवडा येथील टेक्निकल हायस्कूलजवळ एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अर्चनाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरातील लाकडी वाशाला ओढणीने गळफास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्चनाने कोणत्या अज्ञात कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिने गळफास घेतल्याची बाब तिच्या बहिणीच्या लक्षात येताच कुटुंबियांनी तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. एका उमलत्या वयातील मुलीने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने बोंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी रुग्णालय आणि घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अर्चनाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, याचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत. भरदुपारी घडलेल्या या घटनेने राजिवडा परिसरात शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

3358142
Share This Article