तिवराड येथील पोलिस चौकी बंद असल्याने वाहने धावताहेत सुस्साट
पोलिस नसल्याने अपघातग्रस्तांना मदत मिळण्यात अडचणी
रत्नागिरी : निवळी–गणपतीपुळे मार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच सोमवारी दुपारच्या सुमारास आणखी एक अपघात घडला. तिवराड पोलिस चौकीच्या पुढील धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याबाहेर जाऊन झाडावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र सुदैवाने गाडीत असलेले प्रवासी थोडक्यात बचावले.
या घटनेमुळे या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी माचीवलेवाडी येथे साखरेचा ट्रक कोसळल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघात घडल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे तिवराड येथील पोलिस चौकी बंद अवस्थेत असल्याने अपघाताच्या वेळी तत्काळ मदत मिळणे कठीण ठरत आहे. दरम्यान, पर्यटन हंगाम सुरू होताच या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली असून अनेक पर्यटक वेगमर्यादा न पाळता वाहने चालवत असल्याचे चित्र दिसत आहे.
वारंवार होणारे अपघात, बंद पडलेली पोलिस चौकी आणि बेफाम वेग या तिन्ही गोष्टी मिळून हा मार्ग अक्षरशः ‘अपघातांचा सापळा’ बनत चालल्याची तीव्र भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
आता तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून या मार्गावरील अपघातांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.






