चिपळूण : तालुक्यातील पाते पिलवली फाटा परिसरातील खांडोत्री येथील एका चिरेखाणीतून तब्बल ४५ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश चंद्रकांत सुर्वे (वय ४३, रा. निवळी कातळवाडी, ता. चिपळूण) यांची खांडोत्री येथे चिरेखाण आहे. दि. १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चिरेखाणीतून पॉलिकॅब कंपनीची सुमारे ३५० मीटर लांबीची तांब्याची केबल चोरी करून नेली होती. चोरीस गेलेल्या केबलची किंमत अंदाजे ४५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, दि. ६ मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास फिर्यादी यांच्या शेजारील चिरेखाणीचे मालक दिनेश काशीराम घडशी यांनी राजेश सुर्वे यांना फोन करून त्यांच्या खाणीत एक संशयित इसम शिरल्याची माहिती दिली. खाणीवरील मुकादम महेश भिमराव शिंदे यांनी त्या संशयितास हटकले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला पकडण्यात यश आले. त्याच्यासोबत अँप्पे रिक्षामध्ये असलेले अन्य दोन इसम मात्र रिक्षासह पसार झाले.
फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता पकडण्यात आलेल्या संशयितासह त्याच्या साथीदारांनीच पूर्वी केबल चोरी केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी कल्पेश दिलीप शिर्के (वय २९, रा. उगवतवाडी, कालूस्ते बुद्रुक, ता. चिपळूण) व अन्य दोन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) व ३(५) अन्वये सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
चिपळूण : चिरेखाणीतून ४५ हजारांची केबल चोरी; एकास पकडले, दोघे फरार





