रत्नागिरी ः प्रतिनिधी
पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड काँस्टेबल सांची सुदेश सावंत (38, रा.हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर,रत्नागिरी) यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर रत्नागिरी पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा मृत्यू साऱ्यांनाच चटका लावून गेला आहे. या घटनेनंतर अनेक पोलिसांनी सांची यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत व्हॉट्सॲप स्टेट्समधून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सांचीच्या परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर बळ देवो अशी प्रार्थना करण्यात आली आहे.
सांची यांचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 25 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. गुरुवारी रात्री तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी तिला अचानकपणे आकडी आल्याने ती बेशूध्द पडली.तिला अधिक उपचारांसाठी दुसर्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान शुक्रवारी दुपारी 3.18 वा.सुमारास तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सांची सावंत हिचे पतीही पोलिस विभागातील श्वान पथकात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत असून या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सांची ही तिसर्यावेळी गरोदर असताना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. परंतू शुक्रवारी सकाळी तिला आकडी येउन ती बेशूध्द पडली. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी तिला शहरातीलच दुसर्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्यावर सांचीच्या पतीने तिला तातडीने दुसर्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दुर्दैवाने तिचे मुलही दगावले असून सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी 4.30 वा.सुमारास उत्तरीय तपासणीसाठी सांचीचा मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात नेण्यात आला.
दरम्यान सांचीचा मृत्यूने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
महिला पोलिस कॉन्स्टेबल सांची सावंत यांच्या मृत्यूने पोलिसात हळहळ, स्टेटसमधून भावपूर्ण श्रद्धांजली
