GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: मालकाची साडेसहा लाखांची ‘ऑरा’ कार घेऊन  चालक पसार

Gramin Varta
80 Views

रत्नागिरी: तालुक्यातील वळके धनगरवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, भाड्याने प्रवासी नेण्यासाठी घेतलेली साडेसहा लाख रुपये किमतीची कार घेऊन चालक पसार झाला आहे. याप्रकरणी कार मालकाने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी चालकाविरुद्ध फौजदारी पात्र न्यासभंग आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील प्रभानवली येथील रहिवासी संदिप एकनाथ चव्हाण यांची हुंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची ‘ऑरा’ कार (क्रमांक एमएच-०८-बीई-०४६६) तन्मय चंद्रकांत पाटील उर्फ गंगावणे (रा. चाफवली, ता. संगमेश्वर) हा चालक म्हणून चालवत होता. २६ एप्रिल २०२६ रोजी संशयित आरोपी तन्मय हा भाड्याची ट्रीप आहे असे सांगून मालकाची कार घेऊन गेला. मात्र, त्यानंतर तो गाडी घेऊन परतलाच नाही आणि त्याने मालकाशी कोणताही संपर्क साधला नाही. गाडी कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने मालक संदिप चव्हाण यांनी शोध सुरू केला असता, २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास सदर गाडी वळके धनगरवाडी परिसरात असल्याचे त्यांना समजले. मात्र, त्या ठिकाणी शोध घेऊनही गाडी आणि चालक दोघेही मिळून आले नाहीत.

आपली ६ लाख ५० हजार रुपये किमतीची कार चालकाने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेली असून आपली फसवणूक केली असल्याची खात्री पटल्यानंतर संदिप चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीनुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी तन्मय चंद्रकांत पाटील याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३१६(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून पोलीस आता या फरार चालकाचा आणि चोरीला गेलेल्या कारचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून वाहन मालकांनी चालक नेमताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3377925
Share This Article