मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ येथे महसूल विभागाने जप्त करून ठेवलेल्या वाळू साठ्यावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हाप्रळ तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकारी विशाल तानाजी चौगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महसूल विभागाने म्हाप्रळ येथे अनधिकृत गौण खनिज साठ्यावर मोठी कारवाई केली होती. या कारवाईत सुमारे ६०८ ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती आणि पंचांसमक्ष हा साठा त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आला होता. दरम्यान, तहसीलदार यांच्या आदेशानुसार जेव्हा या जप्त वाळूची पुन्हा मोजणी करण्यात आली, तेव्हा त्यातील मोठा साठा गायब असल्याचे निदर्शनास आले.
११ फेब्रुवारी ते २४ मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने ही वाळू चोरून नेली आहे. यामध्ये जमीन मिळकत क्रमांक ८४/१ मधील १७ ब्रास वाळू, ज्याची किंमत ५९,५०० रुपये आहे आणि महादेव नाल्याजवळील ३६ ब्रास वाळू, ज्याची किंमत १,२६,००० रुपये आहे, अशा एकूण ५३ ब्रास वाळूची चोरी झाली आहे. चोरीला गेलेल्या या एकूण वाळूची बाजारभावानुसार किंमत १ लाख ८५ हजार ५०० रुपये इतकी आहे.
या संदर्भात तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झालेली पत्रे आणि त्यातील त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर मंडल अधिकारी विशाल चौगले यांनी रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भरवस्तीत आणि प्रशासकीय निगराणीत असलेल्या जप्त मालाची चोरी झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.






