GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: देशस्तरीय आंबा स्पर्धेत करंजारीतील हेगिष्टे बंधूंचे आंबे प्रथम

Gramin Varta
422 Views

संगमेश्वर : करंजारी येथील प्रगतिशील शेतकरी राजेश आणि सागर रवींद्र हेगिष्टे बंधूंनी देशस्तरीय “मिलांज आंबा महाराजा” आंबा प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट हापूस आंबा फळ विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

हेगिष्टे बंधूंनी वडील रवींद्र एकनाथ हेगिष्टे यांच्या नावावर प्रदर्शनात व स्पर्धेत भाग घेतला होता. दि. १५ ते ३१ मे २०२६ दरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनात देशभरातील नामांकित आंबा उत्पादकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत दर्जेदार, आकर्षक व उत्कृष्ट गुणवत्तेच्या रत्नागिरी हापूस आंब्यामुळे हेगिष्टे बंधूंना बहुमान प्राप्त झाला.

या यशाबद्दल देवरूखच्या क्रांती व्यापारी संघटनेने त्यांचे अभिनंदन केले. या उल्लेखनीय यशामुळे संगमेश्वर तालुक्यातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून अधिकाधिक उत्कृष्ट प्रतीचा रत्नागिरी हापूस आंबा उत्पादनासाठी शेतकरी प्रेरित होत आहेत.

रत्नागिरी हापूस हे केवळ फळ नसून कोकणच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि गुणवत्तेच्या परंपरेचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमातून निर्माण होणारा हा हापूस जगभरातील ग्राहकांना चव, सुगंध आणि तृप्तीचा आनंद देत राहणार असल्याची ही पोचपावती मानली जात आहे.

या यशामुळे करंजारी गाव, संगमेश्वर तालुक्यासह जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना प्रेरणा मिळाली आहे.

Total Visitor Counter

3394843
Share This Article