रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील विश्वनगर भागात एका ४५ वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन पद्धतीने ५५ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे संगमेश्वर तालुक्यातील आंबेड येथील रहिवासी असलेले आणि सध्या रत्नागिरीतील मारुती मंदिर जवळील विश्वनगर, स्वामी बंगला येथे राहणारे राजेश सखाराम आंबेकर (वय ४५) यांचे बँक ऑफ इंडियाच्या कुरधुंडा शाखेत खाते आहे. गेल्या २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास आंबेकर हे विश्वनगर येथील आपल्या निवासस्थानी असताना, अज्ञात आरोपीने काही तांत्रिक बाबींचा आणि क्लृप्त्यांचा वापर करून त्यांच्या मोबाईलद्वारे बँक खात्यावर डल्ला मारला. या अज्ञात इसमाने आंबेकर यांच्या बँक खात्यातून आधी ४०,००० रुपये आणि त्यानंतर १५,४०० रुपये अशी एकूण ५५,४०० रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेत त्यांची फसवणूक केली.
आपल्या खात्यातून रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर आंबेकर यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी २१ मे २०२६ रोजी रात्री ८:०४ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी ॲक्ट) कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा क्रमांक १५९/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या ऑनलाईन चोरीप्रकरणी पोलीस आता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

