GRAMIN SEARCH BANNER

दुनिया चालली चंद्रावर, पण कोकणी माणूस आजही रुग्णाला वाहतोय खांद्यावर!

Gramin Varta
398 Views

संगमेश्वर ओझरवाडीतील गंभीर प्रकार ; रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ? प्रशासनाचे डोळे मिटलेले

देवरुख : आम्ही फक्त निवडणुकीत मतदान करण्यापुरतेच नागरिक आहोत का? दुनिया चंद्रावर चालली आहे आणि आम्ही कोकणी माणूस आजही रुग्णाला खांद्यावर वाहून नेतोय हीच का आमची प्रगती? हा संतप्त आणि तितकाच डोळ्यात पाणी आणणारा सवाल केला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील ओझरवाडी येथील ग्रामस्थ विलास रामाणे यांनी. स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही संगमेश्वर तालुक्यात एका रुग्णाला उपचारासाठी चक्क झोळीत टाकून डोंगर-दऱ्यांच्या खडतर वाटेने खांद्यावरून न्यावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील तिवरे तर्फे देवळे येथील ओझरवाडी या गावाला जोडणारा आजही कोणताही पक्का रस्ता अस्तित्वात नाही. स्थानिक ग्रामस्थ रामचंद्र रामाणे हे गंभीर आजारी असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज निर्माण झाली होती.मात्र,गावात गाडी येण्यासाठी पक्का रस्ताच नसल्याने, त्यांच्या कुटुंबीयांवर आणि भावकीवर अत्यंत बिकट प्रसंग ओढवला.

भावकीने स्वतःच्या जागेतून कच्चा रस्ता देण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवला. मात्र, या कच्च्या रस्त्याला आज तब्बल ८ वर्षे पूर्ण झाली, तरीही त्याचे डांबरीकरण करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. परिणामी, आजारी रामचंद्र रामाणे यांना कपड्याची झोळी करून, ५०० मीटरचा खडतर, चढ-उताराचा डोंगर-दऱ्यांचा रस्ता खांद्यावरून चालत पार करावा लागला.

जर वाटेत काही अघटित घडलं, तर याला जबाबदार कोण?असा उद्विग्न सवाल त्यांचे सुपुत्र विलास रामाणे यांनी प्रशासनाला विचारला आहे. रुग्णाला खांद्यावरून वाहून नेण्याचा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून,यामुळे प्रशासकीय अनास्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

आमच्या करामधून मोठा विकास होत असेल,तर तो आमच्या घरापर्यंत का पोहोचत नाही? ओझरवाडीला हक्काचा पक्का रस्ता देणारा कोणी ‘कैवारी’ अजून जन्माला आला नाही का?” अशा शब्दांत विलास रामाणे यांनी आपली खंत व्यक्त केली.

ओझरवाडीच्या या प्रलंबित रस्त्याचे काम शासनाने आणि प्रशासनाने कोणत्याही राजकारणाशिवाय लवकरात लवकर हाती घ्यावे.येथील नागरिकांना तात्काळ पक्का रस्ता मिळवून देऊन पुढील संभाव्य जीवितहानी टाळावी.

आता या हताश आणि कळकळीच्या विनंतीनंतर तरी संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासन  जागे होणार का? की ओझरवाडीकरांचा हा वनवास असाच सुरू राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➖➖➖➖➖➖ 
🥏 *व्हॉट्स ॲपला जॉईन व्हा*
https://chat.whatsapp.com/G2IPPfoTEDtBdGW9pRFs40
━━━━━━━━━━━

Total Visitor Counter

3485535
Share This Article