चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वालोपे येथे काल, रविवारी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला. एका भरधाव व अनियंत्रित टँकरने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने होमगार्ड कर्मचारी कुणाल आग्रे आणि त्यांची चार वर्षांची चिमुकली कन्या गार्गी आग्रे या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात कुणाल यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण चिपळूण परिसरात तीव्र हळहळ आणि शोककळा पसरली असून वालोपे येथील हसतं-खेळतं आग्रे कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड कर्मचारी कुणाल आग्रे हे रविवारी रात्री आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलीसह दुचाकीवरून घरी परतत होते. वालोपे परिसरात आले असता, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव टँकरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने चिमुकली गार्गी हिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाप-लेकीला पाहून घटनास्थळावरील नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. गंभीर जखमी झालेल्या कुणाल आग्रे यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या त्यांची पत्नी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
या भीषण अपघाताचे वृत्त समजताच वारोपे परिसरातील शेकडो ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक घटनास्थळावर जमा झाले. महामार्गावर वारंवार होणारे जीवघेणे अपघात, वाहनांचा बेफाम वेग आणि प्रशासनाकडून स्पीडब्रेकर, दुभाजक यांसारख्या सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. “प्रशासन आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल करत गावकऱ्यांनी महामार्गाच्या मध्यभागी ठिय्या मांडून ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. रात्रीच्या वेळी अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली आणि रस्त्यावर ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यात अनेक प्रवासी आणि वाहनचालक ताटकळल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली, मात्र गावकऱ्यांचा आक्रोश आणि असंतोषाचा उद्रेक कायम होता.
दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या टँकर चालकाचा ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस, महामार्ग पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा करून दोषी चालकावर कडक कारवाई करण्याचे आणि महामार्गावर तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन दिले. पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आणि समजुतीनंतर तब्बल अडीच तासांनी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले, ज्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत सुरू करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अपघातग्रस्त टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.






