GRAMIN SEARCH BANNER

खत वितरणासाठी केंद्र सरकारचे ॲप; देशभरात प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू

Gramin Varta
33 Views

मुंबई : आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खत वितरणासाठी एका ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.देशातील सर्व राज्यांमध्ये प्रत्येकी दोन जिल्ह्यांत ॲपद्वारे खत वितरणाची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू आहे.

राज्यात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांत २९ मे पासून आठवडाभर चाचणी होणार आहे. आगामी खरीप हंगामात याच ॲपपद्वारे खत वितरण करण्याचे नियोजन आहे.

खरीप हंगामासाठी राज्यनिहाय मंजूर झालेला खत साठा पाऊस सुरू होण्यापूर्वी म्हणजे मे अखेरीस देशातील सर्व राज्यांना वितरीत केला जातो. यंदा आयात केलेला आणि देशात उत्पादीत झालेला एकूण खतसाठा सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांनी घटला आहे. प्रामुख्याने युरिया खताची मोठी टंचाई आहे. त्यामुळे खताचा काळा बाजार, साठेबाजी आणि लिंकिंग रोखण्यासाठी केंद्र सरकारने ॲप आधारित खत वितरणाची नवी प्रणाली विकसीत केली आहे.

देशातील प्रत्येक राज्यात प्रत्येकी दोन जिल्ह्यांत प्रायोगिक तत्वावर चाचणी केली जाणार आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांत २९ मे पासून पुढील आठवडाभर ॲपद्वारे खत वितरण केले जाणार आहे. आठवडाभरातील अनुभव, यश – अपयश, त्रुटींचा आढावा घेऊन पंधरा जून पूर्वी आवश्यक दुरूस्ती करून देशात या पद्धतीने वितरण सुरू केले जाणार आहे.

असे काम करेल ॲप

शेतकर्‍यांनी संबंधित ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करायचे आहे. अॅग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी करून काढलेला शेतकरी ओळख क्रमांकॲपमध्ये टाकल्यानंतर शेतकऱ्याला घरी बसून आवश्यक खताची नोंदणी करता येणार आहे. घराच्या शेजारील कोणत्या दुकानात, कोणते खत उपलब्ध आहे, याची माहिती मिळणार आहे.

नोंदणी केल्यानंतर तीन दिवसांत खत आणावे लागणार आहे. तीन दिवसांत खत न आणल्यास पुन्हा नोंदणी करता येईल. त्यामुळे शेतकर्‍यांना दुकानात जाण्याची गरज नाही. दुकानदारांकडून होणारी खत वितरणातील अनियमितता, गैर प्रकाराला आळा बसणार आहे, अशी माहिती निविष्ठा आणि गुण नियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर यांनी दिली.

राज्यातील उपलब्ध खत साठा (लाख टन)

खत प्रकार गरज एकूण उपलब्धता कंसात

युरिया १५.८० (७.९७)
डीएपी ५.०० (२.६५)
एमओपी १.५० (१.०६)
मिश्र खते १९.०० (१६.६)
संयुक्त खते ७.५० (६.६७)
एकूण ४८.८० (३२.४२)

लिंकिंगला आळा बसेल – कृषिमंत्री

देशभरात एकाचॲपपद्वारे खत वितरण होणार असल्यामुळे खत वितरणात सुसुत्रता येईल. शेतकऱ्याला घरी बसून कोणत्या दुकानात, कोणते खत उपलब्ध आहे, याची माहिती मिळेल. पारदर्शी प्रक्रियेमुळे खताचा काळाबाजार, साठेबाजी आणि लिंकिंगला आळा बसेल. संभाव्य खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर ॲप आधारित खत वितरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Total Visitor Counter

3468193
Share This Article