रत्नागिरी: गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करून आरोपींना कायद्याच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चालू वर्षात कायदेशीर मुदत पूर्ण झालेल्या सर्वच्या सर्व गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने दिलेल्या विहित वेळेत १०० टक्के दोषारोप पत्रे (चार्जशीट) सादर करून रत्नागिरी पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बागटे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हा पोलीस दलाची ही धडक कामगिरी समोर आली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ ते १८ मे २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासाचा विशेष आढावा घेण्यात आला. यामध्ये १० वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे, ज्यांची दोषारोप पत्र सादर करण्याची मुदत ६० दिवस असते आणि १० वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे, ज्यांची मुदत ९० दिवस असते, अशा दोन्ही घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
या कालावधीत जिल्ह्यात १० वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असलेले एकूण ७८० गुन्हे नोंदवले गेले होते. त्यापैकी मुदत पूर्ण झालेल्या ३२७ गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी वेळेत न्यायालयासमोर दोषारोप पत्रे सादर केली आहेत, तर उर्वरित ३२४ गुन्हे तपासाधीन असून त्यांची ६० दिवसांची कायदेशीर मुदत अद्याप संपलेली नाही. दुसरीकडे, गंभीर स्वरूपाच्या म्हणजेच १० वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या ४८ गुन्ह्यांपैकी २५ गुन्ह्यांमध्ये विहित मुदतीत दोषारोप पत्रे दाखल करण्यात आली आहेत. यातील २४ गुन्ह्यांचा तपास सध्या सुरू असून त्यांची ९० दिवसांची मुदत अद्याप शिल्लक आहे.
थोडक्यात सांगायचे तर, ज्या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र सादर करण्याची कायदेशीर मुदत पूर्ण झाली होती, त्या एकाही गुन्ह्यात पोलिसांनी दिरंगाई केलेली नाही. सर्वच्या सर्व प्रकरणांमध्ये १०० टक्के दोषारोप पत्रे न्यायालया दाखल झाली आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अत्यंत वेळेत, काटेकोरपणे आणि आपापसात उत्तम समन्वय ठेवून हा तपास पूर्ण केल्यामुळेच हे यश मिळाले असून, भविष्यातही गुन्हे तपासाची गुणवत्ता आणि पोलिसांची कार्यक्षमता अशीच उच्च दर्जाची राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.






