GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात सर्पदंशाचा वाढता धोका; तीन महिन्यांत ६०३ जणांचे बळी

Gramin Varta
254 Views

रत्नागिरी : जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६०३ नागरिकांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सहसा पावसाळ्यात वाढणाऱ्या या घटना यंदा थंडी आणि उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणावर घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जानेवारी ते एप्रिल या कालावधीत सर्पदंशाबरोबरच विंचूदंशाच्या घटनाही झपाट्याने वाढल्या आहेत. या काळात ४०० हून अधिक नागरिकांना विंचूदंश झाल्याची नोंद झाली असून, माकड, कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांच्या चाव्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. हजारो नागरिकांना विविध प्राण्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे.

यंदा जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे थंड आणि सुरक्षित जागांच्या शोधात साप मानवी वस्तीकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शेतात काम करताना, घराच्या परिसरात किंवा अंगणात सर्पदंशाच्या घटना वाढत आहेत. मागील वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ५७७ सर्पदंशाच्या घटना नोंदल्या गेल्या होत्या. मात्र यंदा केवळ तीन-चार महिन्यांतच हा आकडा ६०३ वर पोहोचल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित झाली आहे. या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आली आहे.

दरम्यान, वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर तातडीच्या उपचारांची कमतरता असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. देवरुख ग्रामीण रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचारात झालेल्या विलंबामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत ग्रामीण रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, तसेच डॉक्टर वेळेत उपस्थित नसल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

उन्हाळा आणि आगामी पावसाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक धोकादायक मानली जात आहे. कोकणात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांनाही माकडांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागत असून काही पर्यटक गंभीर जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सर्पदंश, विंचूदंश आणि प्राण्यांच्या चाव्याच्या रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू असले तरी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3483539
Share This Article