GRAMIN SEARCH BANNER

आधी पुनर्वसन, मगच धरण! जामदा धरणग्रस्तांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

Gramin Varta
129 Views

राजापूर: “आधी पुनर्वसन, मग धरण” अशी ठाम भूमिका घेत राजापूर तालुक्यातील काजर्डे येथील जामदा धरणग्रस्तांनी पुकारलेले साखळी उपोषण आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात धरणग्रस्तांनी आता आरपारची लढाई सुरू केली असून, या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास हा संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, धरणग्रस्तांच्या या न्याय्य हक्कांसाठीच्या लढ्याला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

जामदा धरण प्रकल्पाची अधिसूचना तब्बल २००८ मध्ये जाहीर झाली होती. मात्र, दीड दशक उलटून गेले तरी बाधित क्षेत्रातील संपूर्ण सर्वेक्षण आणि जमिनीची मोजणी पूर्ण होऊ शकलेली नाही. प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे धरणग्रस्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पुनर्वसन नेमके कुठे होणार, ते कोणत्या अटींवर केले जाईल, तसेच बाधित कुटुंबांना रोजगार, जमीन, घर आणि मूलभूत सुविधांची काय हमी मिळणार, या एकाही गंभीर प्रश्नाचे ठोस उत्तर आजमितीस प्रशासनाकडे उपलब्ध नाही. आमच्या डोक्यावर विकासाचा बुलडोझर चालवून आम्हालाच अंधारात ठेवण्याचा हा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत पुनर्वसनाची लेखी आणि ठोस हमी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


या आंदोलनाची दखल घेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख अशोक सक्रे, तालुकाप्रमुख कमलाकर कदम आणि विभागप्रमुख विलास नारकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासनाने धरणग्रस्तांच्या भावनांचा आदर करावा, असे आवाहन केले. शिवसेनेच्या या सक्रिय पाठिंब्यामुळे धरणग्रस्तांच्या लढ्याला आता ‘वाघाचं बळ’ मिळाले असून, प्रशासकीय पातळीवर यावर काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3472183
Share This Article