नवी मुंबई : प्रादेशिक मालवाहतूक बळकट करण्यासाठी कोकणरेल्वे महामंडळाची ३ जून रोजी रत्नागिरी येथे उच्चस्तरीय ‘ट्रेड मीट’चे आयोजन केले. या बैठकीत रत्नागिरी परिसरातून मुंबईतील जेएनपीए येथे कंटेनर वाहतुकीची मोठी क्षमता असल्याचे सांगून जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यापासून पहिली समर्पित कंटेनर रेल्वे सेवा सुरू करण्याचे निश्चित केले.
केआरसीएल’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला संचालक (मार्ग व बांधकाम), मुख्य परिचालन व्यवस्थापक, प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक (रत्नागिरी व कारवार), तसेच केंद्रीय गोदाम महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक उपस्थित होते.
कोकण रेल्वेने अलीकडे उभारलेल्या, तसेच प्रस्तावित मालवाहतूक टर्मिनल्स आणि पायाभूत सुविधांची माहिती देण्यात आली. जलद, विश्वासार्ह आणि किफायतशीर मालवाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वे कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. रत्नागिरी ते जेएनपीटी कंटेनर वाहतूक सुरू झाल्यास कोकणातील उद्योग, व्यापार आणि पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.







