दापोली: दुचाकीवरून पाठीमागे बसून प्रवास करत असताना अचानक तोल जाऊन पडल्यामुळे झालेल्या अपघातात एका ४१ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मंजुळा विश्वनाथ चव्हाण (रा. नवानगर, दापोली) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, या घटनेमुळे नवानगर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
दापोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मयत मंजुळा चव्हाण या त्यांचे पती विश्वनाथ विठ्ठल चव्हाण यांच्यासोबत दुचाकीने नवानगर येथून दापोली बाजारपेठेकडे जात होत्या. नवानगर परिसरातच दुचाकीवरून जात असताना मंजुळा यांचा अचानक तोल गेला आणि त्या रस्त्यावर घसरून पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आणि त्या बेशुद्ध असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबईतील कामोठे येथील एम.जी.एम. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून एम.जी.एम. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना यश आले नाही. ११ डिसेंबर रोजी पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी मंजुळा चव्हाण यांना मृत घोषित केले. या घटनेची रीतसर नोंद १६ डिसेंबर रोजी दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आपल्या पतीसोबत घरगुती कामासाठी बाजारपेठेकडे जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.







