GRAMIN SEARCH BANNER

वेश्वी-बागमांडला फेरीबोट सेवेला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; रायगड आणि रत्नागिरी पर्यटनाला नवी उभारी

Gramin Varta
68 Views

मंडणगड: रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही निसर्गरम्य जिल्ह्यांना जलमार्गाने जोडणाऱ्या वेश्वी-बागमांडला फेरीबोट सेवेला सध्या प्रवाशांची आणि पर्यटकांची प्रचंड पसंती मिळताना दिसत आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेक पर्यटक रायगडमधील विविध पर्यटन स्थळांना भेटी देऊन या फेरीबोटने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करत आहेत, तर काही पर्यटक रत्नागिरीवरून रायगड मार्गे मुंबई आणि पुण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. अतिशय कमी वेळात आणि खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये ही सेवा गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या खाडीवरील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि प्रवाशांना या फेरीबोटचाच मोठा आधार मिळत असून प्रवाशांचा हा प्रवास अत्यंत आनंददायी आणि उत्साहाचा ठरत आहे.

ही महत्त्वपूर्ण फेरीबोट सेवा ‘सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ द्वारे २००७ मध्ये सुरू करण्यात आली असून बाणकोट खाडीवर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट आणि रायगड जिल्ह्यातील बागमांडला दरम्यान धावणाऱ्या या फेरीबोटने प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचत आहेत. या आधुनिक फेरीबोटची क्षमता मोठी असून, यामधून प्रवाशांसोबतच दुचाकी, चारचाकी गाड्या, टेम्पो, बस आणि अगदी प्राण्यांचीही सुरक्षित वाहतूक केली जाते, ज्यामुळे पर्यटकांना स्वतःच्या वाहनासह प्रवास करणे अत्यंत सोपे झाले आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहचता येते आणि विशेष म्हणजे बाराही महिने ही सेवा उपलब्ध असून रात्री दहा वाजेपर्यंत प्रवास करता येतो.

या फेरीबोट सेवेमुळे दोन्ही जिल्ह्यांतील पर्यटन स्थळांची साखळी जोडली गेल्याने पर्यटकांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली असून पर्यटकांना वेश्वी, केळशी येथील महालक्ष्मी मंदिर, अंजारले समुद्रकिनारा, हर्णे समुद्रकिनारा, सुवर्णदुर्ग किल्ला, मुरुड दापोली समुद्रकिनारा, दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ, लाडघर समुद्रकिनारा, बुतोंडी येथील भगवान परशुराम मूर्ती, कोळथरे समुद्रकिनारा, कोळेश्वर मंदिर आणि दाभोळ येथील चंडिका मंदिर अशा रत्नागिरी पर्यटनाचा आनंद घेता येतो, तसेच दाभोळ येथे पोहोचल्यानंतर पर्यटक तेथील पुढील फेरीबोट सेवेचाही लाभ घेऊ शकतात.

यासोबतच रायगड पर्यटनामध्ये श्रीवर्धन परिसरातील हरिहरेश्वर, दिवेआगार, बोर्ली आणि वेळास समुद्रकिनारा अनुभवता येतो, तर पर्यटक दिघी येथून ‘रोहिणी – आगरदांडा’ फेरीबोट सेवेचा पर्याय निवडून तेथून पुढे मुरुड-जंजिरा, नांदगाव, काशिद समुद्रकिनारा, अलिबाग आणि रेवस अशी सफर करू शकतात तसेच श्रीवर्धन येथून माणगाववरून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ ने देखील पुढील प्रवास सुरू ठेवता येतो. आम्ही या फेरीबोटद्वारे सहकुटुंब प्रवास केला असून अतिशय कमी वेळेत आणि कमी पैशात आम्हाला स्वतःची गाडी घेऊन खाडी पार करता आली, यामुळे आमचा प्रवासाचा थकवा वाचला आणि दोन्ही जिल्ह्यांतील निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा मनसोक्त आनंद घेता आला, अशी प्रतिक्रिया नम्रता सुर्वे या पर्यटकाने दिली आहे.

Total Visitor Counter

3468250
Share This Article