लांजा : तालुक्यातील गवाणे येथील मावळतवाडीत विहिरीत पडून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगा सदू घवाळी असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगा घवाळी या गवाणे येथील मावळतवाडीत राहत होत्या. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विद्या विजय मोहिते त्यांना जेवण देत असत. ३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता गंगा घवाळी या विद्या मोहिते यांच्याकडून जेवण करून घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी, ४ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेआठ वाजता विद्या मोहिते नेहमीप्रमाणे त्यांना नाश्ता देण्यासाठी गेल्या असता त्या घरात नव्हत्या. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, गंगा घवाळी या त्यांच्या घरासमोरील विहिरीत उपड्या पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती विद्या मोहिते यांनी लांजा पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल जान्हवी मांजरे या पुढील तपास करत आहेत.
लांजात विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू
