दिल्ली: जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी देशातील तेल कंपन्या गॅसच्या दरांमध्ये बदल करतात.
आज झालेल्या अशाच दर बदलांनंतर व्यवसायिक गॅस सिलिंडर पुन्हा महाग झाले आहेत. 19 किलोचा व्यवसायिक एलपीजी सिलिंडर 42 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे बाहेरचे खाद्यपदार्थांचे दर अधिक वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
किती रुपयांना झाला सिलिंडर?
19 किलोचा व्यवसायिक एलपीजी सिलिंडर आता दिल्लीमध्ये 3099 रुपयांऐवजी 3141 रुपयांना मिळणार आहे. व्यापारी आणि हॉटेल व रेस्टॉरंट चालकांवरील भार वाढणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात आधीच 993 रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती ग्राहकांना या दरवाढीमधून काहीसा दिलासा देण्यात आला आहे.
कोणत्या शहरात किती दर?
दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ करण्यात आली असून कोलकातामध्ये ही वाढ आणखी मोठी म्हणजे 53.50 रुपयांची आहे. मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 3024.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये हीच किंमत 3232 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. हैदराबादमध्ये 3294 रुपयांना आणि पाटण्यात तर 3322 रुपयांना गॅस सिलिंडर मिळत आहेत.
घरगुती एलपीजी सिलिंडरचं काय?
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर असेच वाढत राहिल्यास घरगुती गॅसचे दरही वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सध्या तरी 14.2 किलोचा घरगुती सिलिंडर आता फक्त 916.50 रुपयांना मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि जागतिक घडामोडींचा परिणाम इंधन क्षेत्रावर होताना दिसत आहे. त्यामुळे एलपीजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.
‘एक घर, एक कनेक्शन’ धोरणाची चर्चा
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ग्राहकांना अतिरिक्त गॅस कनेक्शन स्वेच्छेने सरेंडर करण्याचे आवाहन केले असून ‘एक घर, एक कनेक्शन’ या धोरणाची अधिक कठोर अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. एलपीजी वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी तेल कंपन्या एकाच कुटुंबासाठी केवळ एकच गॅस कनेक्शन वैध ठेवण्याच्या भूमिकेत आहेत. अनेकदा एकाच पत्त्यावर वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन किंवा अधिक गॅस कनेक्शन घेतले जातात. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नावावर स्वतंत्र कनेक्शन घेतले जात असल्याची उदाहरणेही आढळतात. नव्या अंमलबजावणीअंतर्गत अशा प्रकरणांची पडताळणी केली जाऊ शकते. एकाच स्वयंपाकघराचा वापर करणाऱ्या कुटुंबासाठी एकच एलपीजी कनेक्शन वैध मानले जाईल. अतिरिक्त कनेक्शन असल्यास ते स्वेच्छेने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर
आज (1 जून 2026) रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या मुख्य दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दरवाढीनंतर सध्या पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.







