GRAMIN SEARCH BANNER

राज्यात मागील चार वर्षांमध्ये इयत्ता पहिलीच्या पटसंख्येत घट; तब्बल १ लाख ३७ हजार ६०६ विद्यार्थी संख्या कमी

Gramin Varta
58 Views

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र मागील चार वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य शाळांच्या संस्थांमधील इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये सातत्याने घट होत आहे.

२०२२ – २३ मध्ये ८ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर गतवर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ लाख ७७ हजार ३९९ इतकी झाली आहे. म्हणजेच चार वर्षांत तब्बल १ लाख ३७ हजार ६०६ विद्यार्थ्यांची घट नोंदविण्यात आली आहे. यूडायस प्लसच्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये ८ लाख १५ हजार ५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यानंतर २०२३-२४ मध्ये ही संख्या ७ लाख ४५ हजार ६३९ वर घसरली. या एका वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ६९ हजार ३६६ ने घट झाली. त्यानंतर २०२४-२५ मध्ये प्रवेशसंख्या ४६ हजार ९४६ ने कमी झाली.

२०२४-२५ मध्ये ६ लाख ९८ हजार ६९३ इतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांची घट कायम राहिली असली तरी मागील दोन वर्षांच्या तुलनेत कमी घट झाली. २०२५-२६ मध्ये ६ लाख ७७ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीला प्रवेश घेतल्याने प्रवेशसंख्या २१ हजार २९४ ने कमी झाली आहे.

पटसंख्या वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या शाळांना सूचना

शाळेच्या परिसरातील अंगणवाडी व बालवाडी यांना शिक्षकांनी भेट देऊन त्यातील इयत्ता १ ली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यादी घ्यावी. शिक्षकांनी अंगणवाडी ताई व पालक यांना भेटून १०० टक्के विद्यार्थी महानगरपालिका शाळेत दाखल व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिका शाळांमधील सोयी, सुविधा, शिष्यवृत्ती, विविध उपक्रम याबाबत पालकांना माहिती द्यावी. नाविन्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करून समाज माध्यमावर प्रसिद्धी द्यावी, अशा सूचना शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिल्या आहेत.

मागील चार वर्षातील आकडेवारी

वर्ष इयत्ता पहिलीला प्रवेशित विद्यार्थी
२०२२-२३ ८१५००५
२०२३-२४ ७४५६३९
२०२४-२५ ६९८६९३
२०२५-२६ ६७७३९९

Total Visitor Counter

3487404
Share This Article