GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये गॅस पंपावर दादागिरी; रांगेत जबरदस्तीने गाडी घुसवत व्यावसायिकाला मारहाण, कारची तोडफोड : ६ अज्ञातांवर गुन्हा

Gramin Varta
279 Views

खेड: तालुक्यातील कळंबणी येथील महानगर गॅस पंपावर गॅस भरण्याच्या रांगेत जबरदस्तीने गाडी घुसवून एका व्यावसायिकाला मारहाण केल्याची आणि त्यांच्या कारची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात ६ अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेड येथील शिवाजीनगर, मैत्री पार्क येथे राहणारे व्यावसायिक उत्तमकुमार सुखराज जैन (वय ५४) हे ३१ मे २०२५ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कळंबणी येथील महानगर गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी गेले होते. त्यांची टाटा कंपनीची नेक्सॉन कार (क्र. एम.एच. ०८ बी.ई. ८१५१) गॅस भरण्याच्या रांगेत उभी होती. याच दरम्यान एका स्विफ्ट डिझायर कारमधून आलेल्या ६ अज्ञात इसमांनी कोणतीही शिस्त न पाळता आपली गाडी जबरदस्तीने गॅस भरण्याच्या रांगेत घुसविण्याचा प्रयत्न केला.

या गोंधळात संशयितांनी फिर्यादी उत्तमकुमार जैन यांच्या नेक्सॉन कारला आपली गाडी घासली. याला जैन यांनी विरोध केला असता, स्विफ्ट डिझायरमधील ६ अज्ञात इसमांनी त्यांना गाडीतून उतरवून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयितांनी जैन यांना अश्लील शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली आणि जीवे मारण्याची दमदाटी केली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने जैन यांच्या नेक्सॉन कारच्या काचा फोडून गाडीचे मोठे नुकसान केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

या थरारक घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या ६ अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम १८९(२), १९१(२), ११५(२), ३२४(२), ३११(२) आणि ३५२ (पूर्वीचे भा.द.वि. कलम १४३, १४७, ३२३, ४२६, ४२७, ५०४, ५०६) प्रमाणे बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण व तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयितांना अद्याप अटक झालेली नसून खेड पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3451730
Share This Article