लांजा : तालुक्यातील वेरळ बस स्टॉप परिसरात जुन्या वादातून एका इसमावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इसमावर उपचार सुरू असून, संबंधित आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाकर उर्फ भाई बाबू जाधव (वय ५९, रा. वेरळ, बौद्धवाडी, ता. लांजा) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. तर जनार्दन गौतम जाधव (वय ३५, रा. वेरळ, चौधारी, ता. लांजा) याच्यावर हल्ल्याचा आरोप आहे. दोघांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी (३ जून) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास प्रभाकर जाधव हे वेरळ बस स्टॉप येथे डिश टीव्ही रिचार्ज करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी जनार्दन जाधव तेथे आला. जुन्या वादाचा राग मनात धरून त्याने प्रभाकर जाधव यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने त्यांच्या कपाळावर तसेच हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रभाकर जाधव गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमींच्या पत्नी भारती प्रभाकर जाधव (वय ५२) यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी जनार्दन गौतम जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) व ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.
लांजा खून अपडेट : जुन्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल







