खेड : भावकीतील लोकांना शिवीगाळ का करत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका ५३ वर्षीय व्यक्तीला बांबूच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना खेड तालुक्यातील चाकाळे खरोशीवाडी येथे घडली आहे. या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर देवजी शिंदे (वय ५३, रा. चाकाळे खरोशीवाडी, ता. खेड) हे २ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जेवण करत होते. त्यावेळी गावातील वैभव वामन कडू हा भावकीतील लोकांना शिवीगाळ करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शिंदे यांनी घराबाहेर येऊन त्याला याबाबत विचारणा केली.
या विचारण्याचा राग आल्याने वैभव कडू याने हातातील बांबूच्या काठीने सुधीर शिंदे यांच्या दोन्ही पायांवर मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले वामन बाळू कडू (वय ६०) आणि विनायक वामन कडू (वय ३५) यांनीही शिंदे यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच तिघांनी मिळून त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी सुधीर शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ३ जून २०२६ रोजी रात्री १.३४ वाजता वैभव वामन कडू, वामन बाळू कडू आणि विनायक वामन कडू यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १६०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.
खेड: चाकाळे येथे भावकीला शिवीगाळ करण्याचा जाब विचारताच हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा







