GRAMIN SEARCH BANNER

मुंबईतील म्युझिक कॉन्सर्टदरम्यान युवकाचा मृत्यू, महिलेची प्रकृती बिघडली

Gramin Varta
125 Views

दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल – एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबईतील वरळी परिसरातील राष्ट्रीय क्रीडा क्लब ऑफ इंडिया डोम (एनएससीआय डोम) येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका “क्लॅंगक्युन्स्टलर ऑल नाइट लॉन्ग” या म्यूजिक कॉन्सर्टदरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची आणि एका ३१ वर्षीय महिलेची तब्येत बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या स्पेसबाउंड कंपनीच्या प्रतिनिधींचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वृषभ गांगुर्डे हा तरुण म्युझिक कॉन्सर्टसाठी वरळी येथील कार्यक्रमस्थळी उपस्थित होता. कार्यक्रम सुरू असताना त्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वृषभ गांगुर्डे हा विधी शिक्षण घेत होता. त्याने कोलकाता येथे विधी शिक्षण घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याच कार्यक्रमादरम्यान ३१ वर्षीय प्रज्ञान रे हिचीही प्रकृती बिघडल्याची घटना घडली. तिला उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आवश्यक वैद्यकीय उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. चौकशीदरम्यान प्रज्ञान रे हिने कार्यक्रमात मद्य आणि ऊर्जा पेयांचे सेवन केल्याचे सांगितले असून कोणत्याही अंमली पदार्थाच्या सेवनाची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, वृषभ गांगुर्डे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सध्या ड्रग ओव्हरडोजची शक्यता फेटाळून लावली आहे. आमच्या आतापर्यंतच्या तपासात ड्रग्सच्या वापराचा कोणताही पुरावा आढळलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी कार्यक्रमस्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रफिती तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासले जात आहेत. मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू असून वैद्यकीय अहवालाचीही प्रतीक्षा केली जात आहे.

या म्युझिक कॉन्सर्टसाठी प्रत्येकी सुमारे चार हजार रुपये तिकीट आकारण्यात आले होते. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तपासात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आता या प्रकरणातील तपास आणि वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच वर्षी एप्रिल महिन्यात गोरेगाव येथील नेस्को एग्जीबिशन सेंटर येथे झालेल्या एका म्यूजिक कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी मृत्यूचे कारण ड्रग्सचा ओव्हरडोज असल्याचे सांगण्यात आले होते आणि नंतर पोलिसांनी त्या प्रकरणात काही जणांना अटकही केली होती.

Total Visitor Counter

3483539
Share This Article