दापोली: तालुक्यातील बुरोंडी चेकपोस्ट येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महाळुंगे गावातील सुशांत दशरथ झिमन या तरुणाची चार महिन्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेमुळे महाळुंगे गावावर आणि संपूर्ण दापोली परिसरावर शोककळा पसरली आहे. अत्यंत मनमिळावू, कष्टाळू आणि तरुण मुलाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च २०२६ रोजी सुशांत आपल्या दुचाकीवरून जात असताना बुरोंडी चेकपोस्टजवळ एका भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सुशांत गंभीररी्या जखमी झाला. त्याच्या पाठीला आणि मानेच्या मणक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले.
मुंबईत गेल्या चार महिन्यांपासून त्याच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. त्याच्या पाठीच्या आणि मानेच्या मणक्यावर अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या होत्या. डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाने सुशांतचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याला वाचवण्यासाठी सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधांचा वापर करण्यात आला. मात्र, त्याच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा होऊ शकली नाही. अखेर शनिवारी पहाटे त्याची चार महिन्यांची ही वेदनादायी झुंज संपली आणि त्याने जगाचा निरोप घेतला.
सुशांतच्या पश्चात त्याचे वृद्ध आई-वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. सुशांत हा अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक तरुण होता. आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत असे. कधी भाजीपाला विकून तर कधी वाहनावर चालक म्हणून काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. अत्यंत मेहनती, नम्र आणि कुटुंबवत्सल असलेला सुशांत हा कुटुंबाचा मुख्य आधार होता. त्याच्या अशा अचानक आणि अकाली जाण्याने त्याच्या वृद्ध आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण कुटुंबाचा एकमेव आधार हिरावून गेल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उपचारांसाठी अनेकांचा मदतीचा हात
सुशांतच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्याच्या महागड्या उपचाराचा खर्च पेलणे कुटुंबाला अशक्य होते. त्यामुळे सुशांतच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे जाहीर आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो नागरिक, विविध सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला होता. सुशांत लवकर बरा व्हावा यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणावर प्रार्थना केली जात होती.

