खेड: राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची साठवणूक आणि वितरण करण्याचे कथित रॅकेट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा केला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, खेडचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे कोकणातील नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी संबंधित गुटखा माफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच ‘मोकोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसी परिसरातील एका गोदामामध्ये लाखो रुपयांचा गुटखा बेकायदेशीरपणे साठवून ठेवण्यात आला आहे. या गोदामातून रात्रीच्या वेळी दुचाकींच्या माध्यमातून परिसरातील विविध भागांत या गुटख्याचे वितरण केले जात असल्याचे कथित स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले गेले आहे. राज्यात गुटख्यावर पूर्णपणे बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा साठा उपलब्ध होणे आणि त्याचे राजरोस वितरण होणे, यामुळे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा माफियांविरोधात कडक पावले उचलत त्यांच्यावर ‘मोकोका’ लावण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर लोटे एमआयडीसीतील या कथित प्रकारामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
ॲड. वैभव खेडेकर यांनी या संपूर्ण गैरप्रकाराचा तीव्र निषेध करत प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता, या संपूर्ण रॅकेटमागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा आणि गॉडफादरचा शोध घेऊन त्यांना तातडीने बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या कथित स्टिंग ऑपरेशननंतर आता अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेतात आणि दोषींवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण खेड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
