रत्नागिरी: मजगांव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नवीन बसवण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर अद्यापही कार्यान्वित न केल्यामुळे त्रस्त झालेल्या मजगांव ग्रामपंचायत प्रशासकांनी येत्या २३ जूनपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात मजगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. फैयाज फकीर महम्मद मुकादम यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) रत्नागिरी येथील कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्र पाठवून आंदोलनाची नोटीस दिली आहे. या पत्रामध्ये त्यांनी मजगांव परिसरातील विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना सहन कराव्या लागणाऱ्या तीव्र त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
मजगांव-शितपवाडी आणि बौद्धवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील जुना ट्रान्सफॉर्मर कमी दाबाचा (लो व्होल्टेज) असल्यामुळे या भागात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला होता. मात्र, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवूनही तो अद्याप महावितरणकडून चालू करण्यात आलेला नाही. परिणामी, दररोज वीज खंडित होत असून तीव्र उकाड्याच्या दिवसांत ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. वारंवार वीज जाण्यामुळे आणि ओव्हरलोडमुळे फ्युज जाणे, वायर जळणे अशा गंभीर समस्या सातत्याने उद्भवत आहेत.
या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने महावितरणच्या विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. यापूर्वी श्री. खोब्रागडे, श्री. बेर्डे यांच्यासह सहाय्यक अभियंता श्री. पवार, श्री. नागवेकर, उपअभियंता श्री. मोरे आणि कार्यकारी अभियंता श्री. फुलपगारे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अधिकाऱ्यांसोबत वारंवार चर्चा करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. वीज मंडळाच्या या उदासीन कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
महावितरणच्या या दिरंगाईला कंटाळून अखेर मजगांव ग्रामपंचायत प्रशासक श्री. फैयाज फकीर महम्मद मुकादम यांनी सोमवार, दिनांक २३ जून २०२६ पासून आमरण उपोषणाचा मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची पूर्वकल्पना देणारे पत्र १८ जून रोजी महावितरणच्या रत्नागिरी कार्यालयात, तसेच माहितीसाठी शहर पोलीस निरीक्षक, रत्नागिरी पोलीस ठाणे यांनाही सादर करण्यात आले आहे. या गंभीर पत्राची दखल घेऊन महावितरण प्रशासन उपोषणापूर्वी ट्रान्सफॉर्मर चालू करणार की आंदोलनाचा मार्ग मोकळा होणार, याकडे आता संपूर्ण मजगांववासीयांचे लक्ष लागले आहे.
