खेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; सुवर्णपदक विजेत्या तन्वी रेडीजच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा

Gramin Varta
40 Views

खेड: भारतीय जनता पार्टी खेड आणि आयुष होमिओपॅथी क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवणारी चिपळूणची आंतरराष्ट्रीय योगपटू तन्वी रेडीज प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. तन्वीने यावेळी योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना तिने दररोज किमान १२ मिनिटे योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. घरात योग क्षेत्राची पार्श्वभूमी नसतानाही केवळ कष्ट, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर आपण जागतिक स्तरापर्यंत मजल मारल्याचे सांगत, तिने तरुणांना कठोर परिश्रम आणि समर्पणाचा कानमंत्र दिला.

यावेळी आयुष होमिओपॅथी क्लिनिकच्या डॉ. वैष्णवी विक्रांत पाटील यांनी योगाचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे सांगत, निसर्गाने दिलेल्या या साधनाचा वापर करून भविष्यातील आरोग्यविषयक खर्च वाचवता येतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांच्या आरोग्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, योग वर्गांच्या माध्यमातून अनेक महिलांच्या शारीरिक समस्यांवर मात करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. योग ही भारताची चार हजार वर्षांची समृद्ध परंपरा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आज जगातील १७७ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सूर्य उत्तरायण अवस्थेत असणारा २१ जून हा दिवस योगासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. योगाचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा हा कार्यक्रम खेड शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *