रत्नागिरी: सहकार चळवळीच्या वृद्धीमध्ये सर्व सरकारांचे मोलाचे योगदान; बाबाजीराव जाधव यांचे प्रतिपादन

Gramin Varta
51 Views

रत्नागिरी: शरद पवार यांच्यापासून ते केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्यापर्यंत सर्वच सरकारांनी सहकार क्षेत्राला वेळोवेळी बळकट केल्यामुळेच महाराष्ट्र आणि कोकणातील सहकार चळवळ आज मोठ्या उंचीवर पोहोचली आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी व्यक्त केले. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील मराठा भवनात आयोजित करण्यात आलेल्या सहकार मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या मेळाव्यात जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासह सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सहकार संस्थांच्या बळकटीकरणावर भर देताना ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की, सहकारी संस्थांनी केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित न करता आधुनिक काळाशी सुसंगत असे बदल स्वीकारणे काळाची गरज आहे. सहकारी संस्थांची आर्थिक प्रगती ही थेट ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडित असते, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसायातील पारदर्शकता जोपासणे ही काळाची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. गिम्हवणेकर, संचालक रामभाऊ गराटे, अमजद बोरकर, आबा टिळेकर, सौ. नेहा माने, गजानन पाटील, मंदार सप्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यातून सहकारी क्षेत्रातील समस्या आणि भविष्यातील संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, सहकाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सर्व स्तरावरून मिळत असलेल्या पाठबळामुळे सहकार चळवळीचा विस्तार अधिक जोमाने होत असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *