मांडवी एक्सप्रेसमधून तरुणीला व चिमुकल्याला ढकलल्याची धक्कादायक घटना; तरुणीचा मृत्यू, आरोपीवर खुनाचा गुन्हा

Gramin Varta
1159 Views

रत्नागिरी : खेड तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकाजवळ मांडवी एक्सप्रेसमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला असून तिच्या दीड वर्षांच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५० वाजण्यापूर्वी शुभ्रा अतिश दिवेकर (वय २५) व तिचा दीड वर्षांचा मुलगा अद्वैत हे चिपळूणहून मुंबईकडे मांडवी एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत आरोपी सचिन सत्यवान जुवळे (वय २९, रा. कोतवली, ता. खेड) हाही प्रवास करत होता. अंजनी रेल्वे स्थानकाजवळ आरोपीने शुभ्रा व तिचा मुलगा अद्वैत यांना धावत्या रेल्वेतून खाली ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतःही रेल्वेतून उडी मारल्याचे तपासात समोर आले आहे.

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या शुभ्रा दिवेकर यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेत दीड वर्षांचा अद्वैत दिवेकर याच्या चेहऱ्यावर व पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आरोपी सचिन जुवळे यालाही जखमी अवस्थेत उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी शुभ्राचे वडील सुभाष देऊ तांबे (रा. अंजनी, बौद्धवाडी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १०९, ३५१(२), ३५१(३) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *