देवरूख: शहरातील आदर्श शाळा क्रमांक 3 च्या धोकादायक बनलेल्या वर्गखोल्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त होत असतानाही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वर्गातून केला जात आहे. या धोकादायक वर्गखोल्या तातडीने पाडण्यात याव्यात यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, मात्र वरिष्ठ अधिकारी या मागणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
देवरूख येथील शाळा क्रमांक 3 ही जिल्हा परिषदेची नावाजलेली शाळा असून, येथे 250 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक वर्षांचा कालावधी लोटल्याने शाळेची इमारत आता जीर्ण झाली आहे. वर्गखोल्यांच्या छतावरील कौले, वासे आणि रिपा कोसळू लागल्या आहेत, तर खांब आणि भिंतीही धोक्याची घंटा वाजवत आहेत. या धोकादायक वर्गखोल्यांच्या परिसरातूनच शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची सतत ये-जा सुरू असते, त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या धोकादायक वर्गखोल्या पाडण्याबाबत शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पंचायत समिती शिक्षण विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अहवालही सादर केला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर केला आहे, मात्र या प्रस्तावाला दोन महिने उलटूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी देखील दुर्घटनेची वाट पाहत आहेत का, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
छोट्या-छोट्या कामांसाठीही शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत, ही दुर्दैवी बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. लवकरात लवकर या धोकादायक वर्गखोल्या पाडण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे, या शाळेला सध्या 3 वर्गखोल्यांची तातडीने आवश्यकता आहे. या संदर्भातही प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यालाही मंजुरी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. एका बाजूला जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडत असताना, देवरूख नं. 3 मधील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती पटसंख्या टिकवण्यासाठी धडपडत आहेत. मात्र त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही शाळांना आवश्यकता नसतानाही वर्गखोल्या मंजूर होत असताना, देवरूख नं. 3 शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये मतदान केंद्र, केंद्रीय संमेलन आणि तालुक्यातील शालेय मोफत पाठ्यपुस्तके ठेवली जातात. असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होणे ही दुर्दैवी बाब आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.