वाटद खंडाळा येथे १७ जुलै रोजी ‘शेतकरी संवाद मेळावा’; कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मिळणार मार्गदर्शन

Gramin Varta
122 Views

विल्ये / अमित कांबळे : रत्नागिरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला आधुनिक शेती आणि कृषी तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी ‘शेतकरी संवाद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता वाटद खंडाळा येथील अशोक मल्टीपर्पज सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या मेळाव्यात प्रामुख्याने शेतीशी संबंधित कायदेशीर बाबी आणि आधुनिक कृषी पद्धतींवर सविस्तर चर्चा होणार आहे. कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील अँड. रोशन पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, शेतीविषयक कायदेशीर प्रश्नांवर ते मार्गदर्शन करतील. तसेच, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ उपकृषी अधिकारी प्रदीप भुवड, मंडळ कृषी अधिकारी सौ. वर्षा नवलकर आणि मंडळ कृषी अधिकारी विकास मेढे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकरी बंधू-भगिनींशी संवाद साधणार आहेत.

खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या समस्या मांडण्याची आणि कृषी तज्ज्ञांकडून थेट उत्तरे मिळवण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या मेळाव्याला खंडाळा, सैतवडे, जांभारी, कासारी, चाफेरी आणि जयगड-वरवडे परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रथमेश गावणकर यांनी राबविलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे खंडाळा पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *