चिपळूण : जि. प. शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांची घरपट्टी माजी विद्यार्थी भरणार

Gramin Varta
416 Views

चिपळूण : भोम येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९५ दहावीच्या तुकडीने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. गावातील आणि परिसरातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी हे माजी विद्यार्थी भरणार आहेत.

जिल्हा परिषद मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९५ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘एक पाऊल शैक्षणिक विकासासाठी’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याबरोबरच त्यांच्या पालकांची एका वर्षाची घरपट्टी भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत बिवली, कापरे, पोसरे, दोणवली, भोम आणि वैजी या गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटपही करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा प्रारंभ येत्या शनिवारी, दि. १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाला संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisement -

या सेवाभावी उपक्रमात मिलिंद शिर्के, रवी दुपटे, सागर चव्हाण, नितीन मोरे, संतोष तामुंडकर, नाजीम खान, श्रीकांत शिर्के, संदेश मोरे, सचिन रामचंद्र कदम यांचा सहभाग आहे.

Total Visitors :
4827407
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *