रत्नागिरी : देशभरातील विविध भागांत घडलेल्या तब्बल ५२ सायबर फसवणुकीच्या तक्रारींशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या रत्नागिरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगर शाखेतील एका बँक खात्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीसीआरपी) आणि सायबर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या म्यूल अकाऊंटच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार वैभव शंकर शिवलकर यांनी फिर्याद दिली असून, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगर शाखेतील खाते क्रमांक ६०५५९९५८६२९ (आयएफएससी : MAHB0000451) या खात्याच्या संशयित खातेदारासह एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा १९ जुलै रोजी रात्री ७.२५ वाजता नोंदविण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत एनसीसीआरपीवर दाखल झालेल्या ऑनलाइन तक्रारींच्या तपासादरम्यान संबंधित बँक खाते संशयास्पद व्यवहारांसाठी वापरले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित खातेदाराने इतर आरोपींशी संगनमत करून देशभरातील विविध भागांतील नागरिकांची विविध आमिषे, दिशाभूल आणि तोतयेगिरीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचा संशय आहे. या खात्याचा वापर सायबर गुन्ह्यांतील रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी ‘म्यूल अकाऊंट’ म्हणून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या खात्याशी संबंधित देशभरातील एकूण ५२ सायबर तक्रारी आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
रत्नागिरीतील बँक खात्याचा देशभरातील ५२ सायबर फसवणूकीसाठी वापर
Leave a Comment




