रत्नागिरी पोलिसांची सायबर गुन्हेगारांवर धडक कारवाई, अकरा म्युल अकाउंटधारकांविरुद्ध गुन्हे दाखल

Gramin Varta
173 Views

रत्नागिरी: वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर मुंबईच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सायबर गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम उघडली असून यादरम्यान सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या अकरा म्युल अकाउंटधारकांवर अकरा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सायबर विभागामार्फत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला सायबर फसवणुकीत वापरण्यात आलेली बँक खाती, एटीएम आयडी, सिमकार्ड तपशील तसेच आर्थिक फसवणुकीबाबतची माहिती प्राप्त झाली होती. या प्राप्त माहितीचे सखोल विश्लेषण करून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना म्युल अकाउंटधारक, सिमकार्ड वापरकर्ते, एजंट व मध्यस्थांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. या विशेष मोहिमेअंतर्गत जानेवारी 2026 पासून राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल मार्फत प्राप्त झालेल्या पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या एकवीस तक्रारींपैकी चौदा तक्रारींमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या मोहिमेदरम्यान मणी रिस्टोरेशन मॉड्युल अंतर्गत नोंद झालेल्या एकशे तीन व्यवहारांपैकी अठ्ठसटी व्यवहारांमध्ये यशस्वी हस्तक्षेप करण्यात आला असून, यादरम्यान तीन लाख साठ हजार सात चौऱ्याऐंशी रुपये दोन पैशांपैकी दोन लाख बेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णो रुपये एक्केचाळीस पैसे इतकी रक्कम पीडित नागरिकांना यशस्वीरित्या परत मिळवून देण्यात आली आहे. तसेच ग्रीव्हन्स रिड्रेसल मॉड्युल अंतर्गत प्राप्त झालेल्या बाराच्या बारा तक्रारींचे यशस्वी निवारण करण्यात आले असून सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बनावट सिमकार्ड व आर्थिक व्यवहारांच्या जाळ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस दल सातत्याने कठोर पावले उचलत आहे.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, मोबाईल सिमकार्ड किंवा इंटरनेट बँकिंग सुविधा वापरण्यास देऊ नये तसेच कोणालाही ओटीपी सांगू नये, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे. पैशांच्या किंवा कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःची बँक खाती किंवा कागदपत्रे इतरांना वापरण्यास देणे हा गंभीर गुन्हा असून, अशा कृत्यात आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. सायबर फसवणुकीची कोणतीही घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधित पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :
4572082
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *