रत्नागिरी ते मुंबई हवाई प्रवासाचे वेध; सी-प्लॅन सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग

Gramin Varta
134 Views

रत्नागिरी: रत्नागिरी आणि मुंबई दरम्यान प्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा व्हावा यासाठी महत्त्वाकांक्षी सी-प्लॅन सेवा सुरू करण्याच्या हालचाली आता प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर वेगाने सुरू झाल्या आहेत. हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या आगामी बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, यासाठी विविध कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक टप्प्यांची पूर्तता करावी लागणार आहे. सागरी महामार्गावर सी-प्लॅन सुरक्षितपणे उतरवण्यासाठी पाण्याचा प्रवाह, वाऱ्याचा वेग, भरती-ओहोटीचे गणित तसेच लँडिंग आणि टेक-ऑफसाठी योग्य असणाऱ्या सुरक्षित जागेचा सखोल शोध घेतला जात आहे.

या प्रकल्पाची व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी एका विशेष सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून, प्रवाशांना परवडणारे तिकीट दर आणि कंपनीला होणारा फायदा याचा ताळमेळ याद्वारे साधला जाईल. सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद, तांत्रिक चाचण्या, आर्थिक गणित आणि सर्व आवश्यक परवानग्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर या विमानसेवेचे अधिकृत वेळापत्रक आणि मार्ग निश्चित केले जाणार आहेत. आगामी काळात हे सर्व टप्पे पार पडल्यास रत्नागिरीकरांना मुंबईचा प्रवास जलद आणि थेट सागरी मार्गातून सी-प्लॅनद्वारे करणे शक्य होणार आहे.

Total Visitors :
4575875
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *